Tuesday 27 March 2018

पवनचक्कीच्या अवजड वाहतूकीमुळे खराब होणा-या रस्त्यांच्यासंदर्भात अधिवेशन संपताच जिल्हाप्रशासनाला बैठक घेण्याच्या सुचना कराव्यात. आमदार शंभूराज देसाईंची तातडीच्या मुद्दयावर सरकारने विशेष लक्ष देण्याचे तालिका अध्यक्षांचे आदेश.


          पाटण तालुक्यात पवनऊर्जा कंपन्याकडून प्रकल्पाकरीता लागणा-या ६० ते ७० टनांच्या अवजड साहित्यांची वाहतूक डोंगरपठारावरील गावांना जोडणा-या ग्रामीण रस्त्यांवरुन केली जात असल्याने याच अवजड वाहतूकीमुळे अत्यंत खराब झालेले ग्रामीण रस्ते मागील वर्षी शासनाच्या हरीत ऊर्जा,नाबार्ड व अर्थसंकल्पातून केले आहेत.पुन्हा पवनऊर्जा कंपन्यांनी त्यांच्या अवजड साहित्यांची वाहतूक सुरु केल्याने सदरचे केलेले रस्ते खराब होवू नयेत याकरीता मोरणा विभागातील गोकूळ तर्फ पाटण या गावांतील महिला रात्रीच्या १ ते १.३० वाजेपर्यंत रस्त्यावर बसून होत्या त्यांची पोलिस यंत्रणेने किंवा कुणीच दखल घेतली नाही.मला रात्रीचे फोन आल्यानंतर ही वाहतूक पोलीस यंत्रणेने थांबवावी अशा सुचना केल्याने ही वाहतूक थांबली परंतू अशाप्रकारे ग्रामीण रस्त्यांची दुरावस्था करणा-या पवनऊर्जा कंपन्यांच्या संदर्भात शासनाने धोरण ठरवावे व अधिवेशन संपताच तालुक्याचे लोकप्रतिनिधी यांचेसमवेत जिल्हा प्रशासनाला बैठक घेवून यासंदर्भात उपाययोजना करण्याच्या सुचना शासनाने जिल्हा प्रशासनाला दयाव्यात अशी मागणी आमदार शंभूराज देसाईंनी तातडीच्या मुद्दयावर बोलताना आज विधानसभेत केल्यानंतर तालिका अध्यक्षांनी सरकारने यासंदर्भात विशेष लक्ष घालावे असे आदेश शासनाला दिले.
          तातडीच्या मुद्दयावर बोलताना पाटणचे आमदार शंभूराज देसाई म्हणाले, पाटण तालुक्यात सह्याद्रीच्या डोगंरपठारावर मोठया प्रमाणात पवनऊर्जा प्रकल्प उभे राहिले आहेत. डोंगरपठारावरील गावांना जोडणा-या इतर जिल्हा मार्ग नव्हे ग्रामीण रस्त्यांवरुन या प्रकल्पाकरीता लागणा-या ६० ते ७० टनांच्या अवजड साहित्यांची वाहतूक केली जात असून या अवजड वाहतूकीमुळे अत्यंत खराब झालेले ग्रामीण रस्ते मागील वर्षी शासनाच्या हरीत ऊर्जा, नाबार्ड व राज्याच्या अर्थसंकल्पातून मागील वर्षीच्‍ दुरुस्त करुन घेतले आहेत. आता परत पवनऊर्जा कंपन्यांकडून ६० ते ७० टनांच्या अवजड साहित्यांची वाहतूक या नवीन केलेल्या रस्त्यांवरुन सुरु केली असल्याने मागील वर्षीच केलेले रस्ते पुन्हा खराब होण्यास सुरुवात झाली आहे. मागील वर्षी केलेले रस्ते खराब होवू नयेत याकरीता आमचे मोरणा विभागातील गोकूळ तर्फ पाटण हे संपुर्ण गांव रस्त्यावर उतरले होते या गावांतील सर्वच्या सर्व महिला रस्त्यावर उतरून रात्रीच्या १२ ते १ वाजेपर्यंत रस्त्यावर बसून होत्या. यावेळी त्याठिकाणी पोलीस यंत्रणांही उपस्थित होती परंतू त्यांची कोणी दखल घेतली नाही रात्रीच्या १ वाजता येथील महिलांचे फोन मला आलेनंतर येथील उपविभागीय पोलीस अधिकारी यांना पवनऊर्जा प्रकल्पाच्या अवजड साहित्यांची वाहतूक तात्काळ बंद करावी अशा सुचना केल्यानंतर पोलीस यंत्रणांनी ही वाहतूक बंद केली. असे प्रकार सातत्याने होत असल्याने शासनानेच यासंदर्भात धोरण ठरवावे. आता विधानसभेचे अधिवेशन सुरु आहे. अधिवेशन संपताच जिल्हा प्रशासनातील जिल्हाधिकारी, जिल्हा पोलीस प्रमुख, सार्वजनीक बांधकाम विभागाचे संबधित जिल्हास्तरीय अधिकारी व अशाप्रकारे पवनऊर्जा प्रकल्पाच्या अवजड वाहूतकीमुळे खराब होणा-या ग्रामीण भागातील रस्त्याकडेच्या गावातील संबधित ग्रामस्थ आणि तालुक्याचे लोकप्रतिनिधी यांची संयुक्त बैठक घेवून यासंदर्भात उपाययोजना करण्याच्या सुचना शासनाने जिल्हा प्रशासनाला दयाव्यात अशी मागणी आमदार शंभूराज देसाईंनी केल्यानंतर तालिका अध्यक्ष यांनी सरकारने यासंदर्भात विशेष लक्ष घालावे असे आदेश शासनाला दिले.


No comments:

Post a Comment