Monday 12 March 2018

शेतक-यांच्या मोर्चावर आमदार शंभूराज देसाईंचा विधानसभेत यल्गार. शेतक-यांचा शासनाने गांभीर्याने विचार करावा.


          हे राज्य शेतक-यांचे आहे शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांची पहिल्या दिवसापासूनची हीच भूमिका आहे की राज्यातील शेतक-यांची कर्जमाफी महत्वाची आहे तसेच त्यांच्या अडीअडचणीही सोडविण्याचे काम शासनाने केले पाहिजे. आज जो शेतक-यांचा मोर्चा विधानभवनाकडे आला आहे त्याकडे शासनाने गांभीर्याने पाहिले पाहिजे.आजच्या मोर्चात महिलांचा सहभाग मोठया प्रमाणात आहे. एवढया लांब त्या न्याय मागण्यासाठी आल्या आहेत, महिलांच्या पायाला चालून चालून फोड आले आहेत त्यातून रक्त सांडत आहे त्यामुळे शेतक-यांच्या या प्रश्नासंदर्भात शासनाने त्यांचा अंत पाहू नये अशी आक्रमक भूमिका शिवसेना आमदार शंभूराज देसाईंनी आज विधानसभेत शेतक-यांच्या मोर्चावर घेतली.
       नाशिक ते मुंबई असा मोठया प्रमाणात शेतक-यांनी काढलेल्या मोर्चाच्या पार्श्वभूमिवर सभागृहात चर्चा करताना आमदार शंभूराज देसाई म्हणाले, हे राज्य सर्वसामान्य शेतक-यांचे आहे. राज्यातील शेतक-यांसाठी जे जे करावे लागेल ते करण्याची भूमिका शासनाने घेतली पाहिजे आमचे नेते शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांची पहिल्या दिवसापासूनची हीच भूमिका आहे की राज्यातील शेतक-यांची कर्जमाफी महत्वाची आहे तसेच त्यांच्या अडीअडचणीही सोडविण्याचे काम शासनाने केले पाहिजे. युतीच्या शासनाने जी कर्जमाफी आता महाराष्ट्रामध्ये दिली आहे ती मोठया प्रमाणात दिली आहे. या कर्जमाफीतून कोणताही शेतकरी वंचीत राहू नये याची खबरदारी शासन घेत आहे. ही चांगली बाब आहे. आदिवाशी भागातील शेतकरी हे देखील महाराष्ट्रातीलच आहेत काही तांत्रिक अडचणीमुळे हे आदिवाशी शेतकरी दुर्दैवाने वंचीत रहात असतील तर त्यांचेकडे ही आपल्याला लक्ष दिले पाहिजे. आज जो किसान मोर्चा मुंबईकडे आला आहे त्या मोर्चाच्या शिष्टमंडळाला राज्याचे मुख्यमंत्री यांनी सहा मंत्रीमहोदयांची समिती स्थापन करुन चर्चेला बोलविले आहे त्याबद्दल मी मुख्यमंत्री यांचे जाहीर आभार मानतो परंतू या समितीनेही शेतक-यांचा अंत पाहू नये शेतकरी त्यांच्या कुटुंबातील महिला या शासनाकडून सकारात्मक दृष्टीकोन ठेवून मोर्चाच्या माध्यमातून शासनाकडे आल्या आहेत. शासनाने ही सकारात्मक दृष्टीकोन ठेवूनच या शेतक-यांच्या मागण्या मान्य करुन त्यांना न्याय देण्याची भूमिका घ्यावी. राज्याचे मुख्यमंत्री यांनी यासंदर्भात स्वत: लक्ष घालावे व शेतक-यांना न्याय मिळवून दयावा अशी आग्रही मागणी आमदार शंभूराज देसाई यांनी सभागृहात बोलताना केली.

No comments:

Post a Comment